Wednesday, June 5

मेथीच्या चौघड्यासाहित्य : मेथी ( कोवळी ) १ वाटी , धुवून , लसुण चेचून , हिंग मीठ , नेहमीची कणिक १ वाटी  पण थोडी घट्ट मळलेली, तूप

कृती

 अतिशय सोपी, झटपट आणि पौष्टिक अशी हे पारंपारिक रेसिपी आहे . तेलात लसूण  आणि हिंग टाकून फोडणी करावी आणि त्यात लगेच थोडे पाणी टाकावे

ह्याला थोडीशी उकळी आली कि त्यात मेथीची भाजी टाकून हलवायचे , २ मिनिटे परतून परत त्यात १ ते २ ग्लास पाणी आणि मीठ  घालायचे

ताट  झाकून शिजायला ठेवून द्यायचे.

आता कणिकेची आपण पोळी करताना लाटतो तशी चौघडी लाटायची , पण पीठ न लावता , तेल लावून. चौघडी  पातळ असावी म्हणजे लवकर  शिजते .

आणि भाजीला उकळी आली कि त्यात सोडून १-२ मिनिटे झाकायची आणि आता गरम गरम तूप टाकूनच खायची

ह्यात मेथीच्या भाजीवरच चव अवलंबून आहे त्यामुळे भाजी कडवट नसावी .

कडधान्याचे कटलेट
साहित्य : मोड आलेले मटकी , मूग, मसूर ( मटकीचे प्रमाण जास्त असावे अथवा आवडीप्रमाणे  )एकत्र करून २ वाट्या , आलं , मिरची , लसूण , जिरे ,मीठ , कोथिंबीर , १ चमचा बेसन, तांदळाचे पीठ


कृती :

मोड आलेले कडधान्ये एका पातेल्यात थोडेसे मीठ टाकून बोटचेपे उकडून घ्यावे . नंतर यातील पाणी काढून टाकून मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे , थोडेसे ओबडधोबडच ठेवायचे .

हे सगळी तयारी होई पर्यंत एका पातेल्यात  पाणी गरम करून त्यावर  चाळणी ठेवावी.

नंतर ह्यात वाटलेले लसूण , आलं , जिरे, मीठ,  मिरची, कोथिंबीर, टाकून निट  एकत्र  करून  घ्यावे. आता ह्यात १ चमचा बेसन, तांदळाचे पीठ मावेल तसे टाकावे. ह्या पीठाची लांबट वळकटी झाली पहिजे.

आता ही वळकटी एका पातळ सुती कापडात गुंडाळून  किंवा  केळी/ पळसाच्या  च्या पानात गुंडाळून १५ -२०  मिनिटे उकडावी. थंड झाल्यावर कापून  shallow fry  किंवा deep fry करावी .

टोमाटो  केचअप  बरोबर मस्त लागते .    :)

Friday, May 31

खजूर रोल

खजूर रोल्स  ( खसखस घालून )

१ वाटी  काळे  खजूर बिया काढून आणि बारीक तुकडे करून, १/२ वाटी काजू , बदाम , अर्धवट बारीक करून , गुलकंद  २ चमचे ,  खसखस १ चमचा भाजून , खोबरं  बारीक किसून, किंचित गरम करून आणि हाताने थोडेसे बारीक  करून
घ्या, १ चमचा तूप


खजूर  तूपावर थोडेसे परतून घ्यायचे आणि पाण्याचा अगदी थोडासा हबका मारायचा , म्हणजे ते चांगले मळून  घेता येते , त्यात काजू , बदाम , गुलकंद  घालून  चांगले मिक्स करून, थोडेसे थंड होऊ द्यायचे .  नंतर हे मिश्रण   एका प्लास्टिक च्या कागदावर, थोडा तुपाचा हात लावून  वरून खालून पिशवी घालून  लांबट वळकटी सारखे करायचे. एका ताटात खोबरं  आणि  खसखस मिक्स करून  घ्यायचे आणि त्यात हि  खजुराची वळकटी घोळवून घ्यायची . नंतर फ्रीज मध्ये थोडा वेळ सेट होऊ द्यायची

मग धार असलेल्या सुरीने रोल्स कापायचे

 खसखस न घालता ही करता येतात , त्यासाठी फक्त खजूर तुपावर  परतून  प्लास्टिक च्या कागदावर पोळी सारखे लाटायचे . कढईत १ चमचा साखर घेऊन १ चमचा पाणी टाकायचे आणि साखर विरघळल्यावर  काजूची बारीक पूड टाकायची आणि  थोडीशी मिल्क पावडर टाकायची . हे मिश्रण पण  प्लास्टिक च्या कागदावर पोळी सारखे लाटायचे, दोन्ही पोळ्या एकाच आकाराच्या झाल्या पहिजेत.

नंतर गुंडाळून फ्रीज मध्ये अर्धा तास सेट होऊ द्यावे , आणि कापाव्या . फ्रीज मध्ये ठेवल्याने मिश्रण कडक होऊन गोलाकार  रोल्स कापले जातात

त्याचे फोटो


Thursday, May 30

आंबा वडी आणि आंबा पोळीअसं  म्हणतात कि इंग्रजांच्या काळात आंब्याला Bathroom Fruit म्हणत , कारण तो खाताना कपडे खराब होत असत, म्हणून ज्यांना आंबा खायचा त्यांनी कामावर असताना बाथरूम मध्ये खायचा.  :)

माझ्या लहानपणी मी अतिशय हावरट सारखा आंबा खाल्ला, ड्रेस, तोंड  पूर्ण रंगून जाई पर्यंत.  चोखुन खायचे गोटी आंबे , खाऊन झाले कि कळायचे किती खाल्ले असतील ते  … आता मिळतच नाहीत  गोटी आंबे. 

आंब्याच्या मोसमात आंब्याचे किती प्रकार करावेत आणि किती नको… आंब्याची ताजी फळे वर्षभर मिळू शकत नाहीत. म्हणून ती निरनिराळ्या पद्धतीने टिकविणे आवश्‍यक आहे. आंब्यापासून चटणी, लोणचे, पन्हे, स्क्वॅश, आमरस, आंबापोळी, मुरंबा, कॅण्डी तयार करता येते. 

फळांच्या या राजाला प्रसन्न करण्यासाठी आंबा वडी आणि आंबा पोळी 

आंबा वडी

साहित्य :

खवलेलं  ओल  खोबरं   १ वाटी  दाबून , पाउण  वाटी हापूस आंब्याचा रस,  साखर १ वाटी  ( पसरट ), वेलची  पावडर , तूप 

कृती :

वेलची पावडर सोडून सर्व बारीक आचेवर ठेवून सारखे हलवत राहायचे. आणि खोबऱ्या च्या वडी सारखे चिकट झाले आणि  हलवणं हाताला जड वाटले  कि बंद  करायचे .वेलची पावडर मिसळुन घ्यायची . 

एका ताटावर पिठी साखर पसरून त्यावर वड्या थापायच्या . वरून सजावटी साठी काजू आणि बदाम. आंबा पोळी 


हापूस आंब्याचा रस ( पाणी अजिबात न घालता ) , साखर, मीठ किंचित , वेलची पूड, हे सर्व मिक्सर वर  एकत्र करून घ्यायचे . 

ताटाला तूप लावून  त्यावर रस  एकसारखा पसरून घ्यायचा आणि दिवसभर  उन्हात ठेवायचे . वरून एखादे  पातळ कापड झाकायचे म्हणजे धूळ पडणार नाही . साधारण १ सेमि. चा थर असावा. 

संध्याकाळी  पोळी उलटून काढायची , आणि २ दिवस कडक उन्हात वाळवायची. आंबा पोळी प्लॅस्टिकच्या पिशवीत हवाबंद करून थंड व कोरड्या ठिकाणी ठेवावी. 


महत्चाचे : आंब्याचा  सिझन संपल्यावर मग, पोळ्या  हळू हळू बाहेर काढायच्या …. : ) 
Saturday, May 18

काही सलाडचे फोटो


जेवण करायच्या आधी अशी मस्त सजवलेली  डिश समोर आली तर …… :')

काकडी माझी अतिशय आवडती …. 
आता जेवणासाठी पोट तयार आहे ……. :)


काही पौष्टिक पदार्थ


मुगाचे कढण
१ वाटी मूग शिजवून , १ चमचा जिरेपूड, हिंग , मीठ
मूग शिजवून , त्यातील पाणी चाळणीने गळून घ्यावे , मूग बारीक करून घ्यावे , काढलेले पाणी घालून एकजीव करावे .तुपात हिंग, जिरेपूड घालून गरम गरम सूप सारखे प्यावे .
हे पचायला अतिशय हलके , भूक वाढवणारे असते .
मूग +नाचणीचे लाडू 
हिरवे मूग भाजून +नाचणी मोड आणून वाळवून पीठ ,+ पोहे +डाळ तुपावर भाजून भरडसर पीठ करून , + बदाम + अक्रोड
थोड्या मेथ्या पण भाजून टाकू शकता .
खजुराचे सरबत
काळे खजूर पाण्यात ३-४ तास भिजवून बी काढून , मिकसर मध्ये चांगले फिरवून घेऊन तयार दुध , साजूक तूप, गुळ चवीनुसार घालून प्यावे .हे पिल्याने शरीरातील लोह वाढते
रंगीबेरंगी भेळ 
मटकी, मूग - मोड आणून त्यात टोमाटो , गाजर , काकडी,कोबी , बीट , कांदा बारीक करून , खजूर+चिंचेच कोळ , जिरेपूड, मीठ, कोथिंबीर पुदिना , दही/ लिंबू अशी रंगीबेरंगी भेळ लहान मुलांना नक्की आवडेल
मी तर ह्याला विटामिन +प्रोटीन ची भेळ म्हणेन स्मित
बाजरीचा खिचडा
बाजरी भरडसर दळून किंवा थोडीशी ओलि करून बारीक करून, चांगली शिजवून घ्यावी , त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा, जिरे, कोथिंबीर, गोड दही / ताक , लसूण बारीक करून , मीठ घालून खावे
मक्याचा ठोम्बरा
मक्याच्या भरडलेल्या कण्या ताकात कूकर मध्ये शिजवून, त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा, जिरे, कोथिंबीर, लसूण बारीक करून , मीठ घालून खावे
तांदळाची उकड 
१ वाती ताकात तांदळाचे पीठ कालवून घ्यायचे आणि फक्त तूप+मिरची+जिरे+कडीपत्ता घालून फोडणी टाकायचे , गाठी होऊ द्यायच्या नाहीत .मस्त लागते गरम गरम ....
ज्वारी/नाचणीचे आंबील 
रात्री ज्वारी/ नाचणीचे पीठ दह्यात भिजवून ठेवायचे. सकाळी पाण्याला आधण येईपर्यंत गरम करून त्यात मीठ घालून उकळी आली कि हे पीठ सोडायचं ए, गाठी होऊ न देत, लसून आणि जिरे बारीक करून टाकायचे आणि गरम गरम वरपायाचे ...
ह्याच बरोबर, ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ-तूप खाणे, जेवणात तिळाची चटणी, लसणाची चटणी, ओली हळद-आंबेहळद यांच्यापासून बनविलेले लोणचे यांचा समावेश असणे, रोज डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू वा अहळिवाचा लाडू खाणे, जेवणानंतर ओवा-तीळ-बाळंतशोपा वगैरे द्रव्यांपासून बनवलेली सुपारी खाणे/ आवळा सुपारी खाणे चांगले असते
आवळा सुपारी
नुसते जिरे आणि मीठ लावून वाळवण्या पेक्शा अशी करून पहा , बाहेरच्या आवळा सुपारी पेक्षा ही जबरदस्त लागते
१ किलो आवळे चाळणीवर वाफवून, ७-८ लिंबाचा रस ,जिरे ओवा बारीक करून, शेंदेलोण , पादेलोण , आमचूर पावडर , ज्येष्ठमध , मीठ घालून थोडा वेळ मुरत ठेवा , मग त्यात आवळा घालून चांगले कालवून ,प्लास्टिक च्या कागदावर वाळवा

Monday, January 21

व्हेज मोमो

 सारण :

2 कप कोबीचा किस,अर्धा कप पनीर किंवा तोफ़ू,
9-10 फरस बी बारीक चिरून , 1 सिमला मिरची बारीक चिरून 
मीठ व मिरपूड, सोयासौंस  
हवे असल्यास गाजर पण बारीक किसून घालू शकता 
अर्धा चमचा तेल, 

पारी 
एक कप मैदा ,( कणिकेचे फार चांगले होत नाहीत )
मीठ,तेल

कृती 

 मैदा, मीठ व तेल घालून घट्ट मळून झाकून ठेवा. साधारण १ तास 
 तेल गरम करुन त्यात कोबी टाका, नंतर सिमला मिरची, फरस बी बारीक चिरून  अर्धे कच्चे शिजवून घ्या, 
 थंड झाल्यावर पनीर बारीक किसून टाका  
 मैद्याच्या छोट्या पातळ पुरी लाटून ,थंड केलेले सारण टाकून , कारंजी प्रमाणे किंवा खाली दाखवल्याप्रमाणे आकार द्या 
 आणि मोदक प्रमाणे १०-१५ मिनिट उकाडा 
  
हा मूळचा तिबेटिअन पदार्ध आहे, ह्याला खूप सुंदर आकार देत येतात 
त्यासाठी  खालील फोटो पहा..

ह्याबरोबर पुदिना+मिरची+कोथिम्बिर घालून केलेई चटणी किंवा  टोमाटो सालसा मस्त लागतो. 

आणि त्या नंतर मी केलेले मोमो...